पुणे : मध्य रेल्वेच्या गाड्यांतील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांची पसंती मिळत आहे. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची दृश्ये अथवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी प्रवासी व्हिस्टाडोम डब्यांना प्राधान्य देत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी या कालावधीत या डब्यांतून १ लाख ४७ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यातून रेल्वेला २१ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.
मध्य रेल्वेने काही निवडक गाड्यांमध्ये व्हिस्टाडोम डब्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याची सुरुवात २०१८ मध्ये मुंबई-मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसपासून झाली. याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्याने इतर गाड्यांमध्ये या डब्यांचा वापर करण्यात आला. या डब्यांचे छत काचेचे असून खिडक्या मोठ्या आकाराच्या आहेत. यामुळे प्रवासादरम्यान या डब्यांतून निसर्गसौंदर्याचा आनंद प्रवाशांना घेता येतो. या डब्यांतून एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत १ लाख ४७ हजार ४२९ प्रवाशांनी प्रवास केला. यातून मध्य रेल्वेला २१ कोटी ९५ लाख रुपयांचा महसूल मिळाला.
हेही वाचा : पिंपरी- चिंचवडकरांना आणखी किती दिवस दिवसाआड पाणी? प्रशासनाची मोठी माहिती
व्हिस्टाडोममधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक संख्या मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसमध्ये नोंदविण्यात आली. या गाडीतील व्हिस्टाडोम डब्यातील प्रवासी संख्या २६ हजार २६९ नोंदविण्यात आली. त्याखालोखाल मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस २६ हजार १८३, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस २५ हजार ६४४ प्रवासी, मुंबई-पुणे- मुंबई डेक्कन क्वीन २५ हजार ३०, मुंबई-करमाळी- मुंबई तेजस एक्सप्रेस २४ हजार ३१ आणि पुणे- सिकंदराबाद -पुणे शताब्दी एक्सप्रेस २० हजार २७२ अशी प्रवासीसंख्या आहे.
हेही वाचा : ‘महाराष्ट्रात अजित पवार पर्व सुरू’, शरद पवारांवर सुनील तटकरेंचा पलटवार
उत्पन्नात तेजस एक्स्प्रेस आघाडीवर
व्हिस्टाडोम डब्यांची सुविधा असलेल्या गाड्यांमध्ये उत्पन्नात मुंबई-करमाळी-मुंबई तेजस एक्सप्रेस ६.१८ कोटी रुपये उत्पन्नासह आघाडीवर आहे. त्याखालोखाल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस ५.१४ कोटी रुपये, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस ४.१६ कोटी रुपये, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन २.२९ कोटी रुपये, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस २.२० कोटी रुपये आणि मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस १.९८ कोटी रुपये उत्पन्न आहे.
हेही वाचा : “…ते पाप पृथ्वीराज चव्हाणांचे”, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा गंभीर आरोप
व्हिस्टाडोम डब्यांची वैशिष्टे
- काचेचे छत
- रुंद खिडक्या
- एलईडी दिवे
- फिरवता येण्याजोग्या खुर्च्या
- स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर
- दिव्यांगांसाठी सरकते दरवाजे
- प्रवाशांसाठी गॅलरी