पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘आपली पीएमपीएमएल’ या ॲप्लिकेशनसारखेच बनावट ॲप अज्ञातांनी सुरू करून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट ॲप अजूनही सुरू असल्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकृत ॲपचाच वापर करण्याचे आवाहन ‘पीएमपी’ प्रशासनाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पीएमपी’च्या प्रवाशांच्या सोयीसाठी २६ जानेवारी रोजी ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप सुरू करण्यात आले. या ॲपद्वारे बस कोठे आहे, बस मार्ग या बाबतची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध होते. प्रवाशांकडून या ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही अज्ञात व्यक्तींकडून समाजमाध्यमांवरील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम अशा ऑनलाइन माध्यमांवर ॲपची जाहिरात प्रसिद्ध करून नागरिकांना प्रलोभन दिले जात आहे. ‘एकदा ॲप डाऊनलोड केल्यावर पुन्हा पैसे भरावे लागणार नाही,’ अशी खोटी माहिती प्रसारित करून बनावट ॲप घेण्यासाठी आश्वासन दिले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. समाजमाध्यमांवरही अशी माहिती आढळून आल्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

प्रवाशांनी खोट्या जाहिरातींच्या प्रलोभनाला बळी पडू नये. अधिकृत संकेतस्थळावरून ॲपचा वापर करावा. पीएमपी प्रशासनाकडून कुठलीही सवलत देण्यात आलेली नाही. कोणाची फसवणूक झाली असेल किंवा प्रलोभन दाखवण्यात आले असल्यास तातडीने तक्रार करावी. ऑनलाइन संकेतस्थळांवर लक्ष ठेवण्यात येत असून कोणीही फसव्या माहितीचा प्रसार करू नये, असे आवाहनही पीएमपी प्रशासनाने केले.

समाजमाध्यमांवर बनावट ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून किती लोकांची आर्थिक फसवणूक झाली आहे, याची माहिती घेण्यात येत आहे. तसेच पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल