पुणे : हवाई प्रवासातील अडथळ्यांची शर्यत मागील काही दिवसांपासून कायम आहे. अनेक विमानांना काही तासांचा विलंब होत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यातच पुणे विमानतळावरील गैरसुविधांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, २६ जानेवारीपर्यंत दिल्लीहून येणारे आणि दिल्लीला जाणारे अशी दोन विमाने दररोज रद्द केल्याचा फटकाही प्रवाशांना बसत आहे.
पुणे विमानतळावर चेक-इन करण्यासाठी एक तासांहून अधिक काळ रांगेत थांबावे लागत असल्याची बाब आता नित्याची बनली आहे. याचवेळी अनेक विमानांना दोन ते तीन तासांचा विलंब होत आहे. याची माहिती प्रवाशांना वेळेवर दिली जात नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. एखाद्या विमानाला सुरुवातीला तासभर उशीर होणार असल्याचे विमान कंपनीकडून प्रवाशांना कळविले जाते. काही वेळानंतर पुन्हा दोन तास उशीर होणार असल्याचे प्रवाशांना सांगितले जाते. यामुळे प्रवाशांचा गोंधळ वाढत आहे. त्यातच विमानतळावरील विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे याचे समाधानकारक उत्तर नसल्याने प्रवासी त्रस्त होत आहेत. हा प्रकार सर्वाधिक इंडिगोच्या बाबत होत आहे, अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली.
हेही वाचा : महायुतीचे सरकार आल्यास मंत्रालयाचे गुजरातला स्थलांतर;माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची टीका
दिल्ली विमानतळ प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई सरावामुळे २६ जानेवारीपर्यंत सकाळी १०.२० ते दुपारी १२.४५ या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे दिल्लीहून पुण्याला येणारे आणि पुण्याहून दिल्लीला जाणारे अशी दोन विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्याचाही फटका प्रवाशांना बसत आहे.
अनेक प्रवाशांनी विमानातून उतरल्यानंतर बॅगा ताब्यात घेताना त्या फाटल्याची तक्रार केली आहे. याबाबत नुकसानभरपाई तर दूरच उलट योग्य उत्तरही विमान कंपन्यांचे प्रतिनिधी देत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. डिजियात्रासाठी आधी टोकन घ्यावे लागत असून, त्यानंतर त्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रक्रिया केवळ नावालाच कागदाविना असून, प्रत्यक्षात टोकनसाठी कागदाचा वापर केला जात आहे, असेही अनेक प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले.
हेही वाचा : भगवान श्रीराम हे सर्वांचे, आम्ही लवकरच अयोध्येत दर्शनाला जाणार; आदित्य ठाकरे
नवीन टर्मिनल ते एरोमॉल बसची सुविधा
पुणे विमानतळाशेजारी कॅबसाठी एरोमॉलमध्ये वाहनतळ आहे. या ठिकाणी येऊन प्रवाशांना कॅब मिळवावी लागते. विमानतळाचे नवीन टर्मिनल ते एरोमॉल हे अंतर अर्ध्या किलोमीटरहून अधिक आहे. नवीन टर्मिनलमध्ये टॅक्सीला प्रवेश देण्याची भूमिका विमानतळ प्राधिकरणाने घेतली होती. यावरून गदारोळ होताच नवीन टर्मिनलपासून प्रवाशांना एरोमॉलपर्यंत नेण्यासाठी बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
पुणे विमानतळावरील प्रवासी (नोव्हेंबर २०२३)
- एकूण प्रवासी – ७ लाख ७१ हजार ३३१
- देशांतर्गत प्रवासी – ७ लाख ६५ हजार ८२०
- आंतरराष्ट्रीय प्रवासी – १४ हजार ५०२
- एकूण विमाने – ५ हजार ११९
- देशांतर्गत विमाने – ४ हजार ९९९
- आंतरराष्ट्रीय विमाने – १२०