पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपुलानंतरही पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास अडथळा निर्माण होत असल्याने चार किलोमीटर लांबीचा पादचारी मार्ग करण्याचे नियोजित आहे. पादचारी मार्गाबरोबरच पादचारी पूलही उभारण्यात येणार असून, त्याबाबतचा आराखडा महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. महापालिका आणि राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
चांदणी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भुपृष्ठ आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गेल्या महिन्यात करण्यात आले. मात्र या उड्डाणपुलामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलंडण्यास असंख्य अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्याबाबतचा आराखडा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा : शहरी गरीब योजनेच्या उत्पन्न मर्यादेत वाढ…ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक
महापालिकेने यासाठी चांदणी चौकात अभ्यास करून समस्या आणि सुधारणा याचा आराखडा तयार केला आहे. महापालिकेला पादचारी मार्ग बांधण्यासाठी सुमारे १५ कोटी तर महामार्ग प्राधिकरणाला पादचारी पूल बांधण्यासाठी सुमारे १० कोटींचा खर्च अपेक्षीत आहे. असा एकूण २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये मूर्तिदान, निर्माल्य संकलनासाठी रथ; विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक
चांदणी चौक परिसरातील रस्त्यावर पादचारी मार्ग बांधणे, महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पुलाची उभारणी, पादचारी पुलावर ये-जा करण्यासाठी जीने, बावधन ते कोथरूड या दरम्यान महामार्गाल समांतर पादचारी पूल, वेद भवनाच्या जवळ रस्ता ओलांडण्याची सुविधा असा हा आराखडा आहे. या आराखड्यासंदर्भात महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाची येत्या काही दिवसांत एकत्रित बैठक होणार आहे. महापालिकेकडून त्यांच्या हिश्शाचा खर्च देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.