पुणे : आजारी प्राण्यांची रुग्णालयात ने-आण करणाऱ्या वाहनाच्या (ॲम्ब्युलन्स) धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव भागात घडली. वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले असून, विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली. लोहगावमधील फाॅरेस्ट पार्क रस्ता परिसरात ही घटना घडली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरेंद्रसिंग शैलेंद्रसिंग कुम्पावत (वय ४८, रा. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, चंदननगर, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी प्राण्यांची ने-आण करणाऱ्या ॲम्ब्युलन्सचालक संजय चण्णाप्पा मुल्लोळी (वय २६, रा. वाडेबोल्हाई, नगर रस्ता, ता. हवेली) याला अटक करण्यात आली. मुल्लोळी याने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सुरेंद्रसिंह यांचा लहान भाऊ महेंद्रसिंग (वय ४३) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : पावसाचा फटका! पुण्यात ‘इतकी’ कोसळली झाडे!

सुरेंद्रसिंग शनिवारी (१३ जुलै) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास लोहगाव भागातील फाॅरेस्ट पार्क परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव रुग्णवाहिकेने रस्ता ओलांडणाऱ्या सुरेंद्रसिंग यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्रसिंग यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी मुल्लोळी याला ताब्यात घेण्यात आले. त्याने मद्यप्राशन केल्याचे उघड झाले. मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

हेही वाचा : अखेर पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल सुरू! जाणून घ्या पहिल्या टप्प्यात कोणत्या विमानांचे उड्डाण

मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र

कल्याणीनगर अपघात प्रकरण, तसेच बोपोडीत भरधाव मोटारीच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. मद्यपी वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत १६८४ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. वाहतूक नियमभंग, तसेच मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. बोपोडीत पोलीस हवालदाराला धडक देणाऱ्या मोटारचालक तरुणाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड झाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune pedestrian killed after being hit by ambulance on forest park road lohgaon pune print news rbk 25 css
Show comments