पुणे : पादचाऱ्याला धमकावून त्याच्याकडील मोबाइल चोरण्यात आल्याची घटना लष्कर भागातील महात्मा गांधी पीएमपी स्थानक परिसरात घडली. पादचाऱ्याने प्रतिकार केल्याने चोरटे दुचाकी सोडून पसार झाले. लष्कर पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिरोज रशीद शेख (वय २४) याने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख हा श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील एका गाळ्यावर कामाला आहे. तो रविवारी (१५ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास लष्कर भागातील महात्मा गांधी पीएमपी स्थानक परिसरातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्याला अडवून धमकावले. त्याच्या खिशातील मोबाइल संच काढून घेतला. त्यानंतर शेखने त्यांना प्रतिकार केला. चोरट्यांशी त्याची झटापट झाली. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. शेख याचा आरडाओरडा ऐकून नागरिक तेथे आले. नागरिक आल्याचे पाहून चोरटे तेथेच सोडून पसार झाले.

हेही वाचा : छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री करा – ओबीसी नेते लक्ष्मण हाके

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांंनी घटनास्थळी भेट दिली. दुचाकीच्या क्रमांकावरुन पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली. नागरिकांकडील मोबाइल संच, तसेच दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

Story img Loader