रस्त्यावर मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर चालणाऱ्यांचा हक्क असतो. असायला हवा. अशा पट्ट्यांवरून जाणाऱ्या मित्राला गेल्याच आठवड्यात वाहतूक नियंत्रक दिव्याचा नियम तोडून भरधाव वेगाने आलेल्या मोटर सायकलने अशी काही जोरात धडक दिली, की तो जागीच पडला. दरम्यान नेहमीप्रमाणे तो मोटर सायकलस्वार काही घडलंच नाही, अशा थाटात त्याच वेगानं पुढे निघूनही गेला. जागीच खिळलेल्या त्या मित्राला वाहनाचा क्रमांक टिपण्याचीही शुद्ध राहणं शक्य नव्हतं…खुब्याच्या हाडाची मोठी शस्त्रक्रिया करावी लागली, त्याच्यावर. आपली काहीही चूक नसताना, मिळालेली ही जबर शिक्षा आपल्या जिवावरच बेतेल, याची त्या बापड्याला शंकाही आली नाही. पण ते घडायचंच होतं.
सारं शहर आता रोगग्रस्त झालंय. हा रोग शरीराला होणारा नसल्यानं कुणाच्या लक्षातही येत नाही. बरं, त्यावर काही औषध योजना करावी, तर सगळेजण लगेचच चवताळून उठतात. त्यामुळे असं रोगग्रस्त राहण्यातच सगळ्यांना कमालीचं सुख मिळत असावं. त्या सुखा
चा इतरांवर काय परिणाम होत असेल, याचा विचार करण्याची शक्तीच न उरणं, हे या रोगाचं व्यवच्छेदक लक्षण. होतं काय, की शहरातल्या कुठल्याही रस्त्यावर दिवसाच्या चोवीस तासात प्रत्येक क्षणाला नियम मोडण्याचा रोग झालेले नागरिक जिवाच्या आकांताने वाहनावरून पळत असतात. मग प्रवेश बंदचा फलक पाहायची गरज वाटत नाही, वाहतूक नियंत्रक दिव्याची काळजी वाटत नाही, समोरून येणाऱ्या वाहनांना वाट मिळूच नये, म्हणून संपूर्ण रस्ता एकेरी वाटावा, असा व्यापून टाकताना लाजही वाटत नाही. पदपथही आपल्या बापाच्याच मालकीचे असल्याने त्यावरून वाहन चालवण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज वाटत नाही… या अशा रोगग्रस्त झालेल्या शहराला कुणी वाली नाही. कारण नियम नावाची गोष्ट न पाळण्यासाठी असते, यावर समस्त वाहनचालकांचं एकमत झालंय.
हे ही वाचा…अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ केलेले पोलीस पुन्हा सेवेत
वाहनांची अतिरेकी संख्या. अपुरे रस्ते, जगण्याचा अतिप्रचंड वेग, डोक्यावर सतत टांगलेली वेळेची तलवार, अशा अवस्थेतील समस्त नागरिक इतरांच्या जिवाला इतके कस्पटासमान का मानत असतील? रस्त्यावर अपघात झाला, तर सहजपणे कुणी लगेच मदतीलाही का येत नाही? पोलीस यंत्रणा चुकून जागेवर असेलच, तर कडक कारवाई का होत नाही? अशा प्रश्नांनी सर्वसामान्य अक्षरश: पिचून गेले आहेत. अशा अपघाताची तक्रार घेतानाही पोलीस खळखळ करतात. हेलपाटे मारायला लावतात. पुरावे आणायला सांगतात. सामान्याला याचा इतका जाच होतो, की नको ते पोलीस ठाणे असं म्हणायची वेळ येते. वाहतूक नियंत्रक दिव्यापाशी थांबलेल्या नियम पाळणाऱ्यांना बिनधास्त धडक मारून जाणाऱ्यांना कुणी अडवत नाही. लाल दिवा असताना थांबणं, हाच मुळी त्यांच्या लेखी गुन्हा असतो. चालणाऱ्यांनी जीव मुक्त धरून चालावं, नियम पाळून वाहन चालवणाऱ्यांनीही ते पाळता कामा नयेत, अशा मानसिक विकृतीने अख्ख्या शहराला सध्या गिळंकृत केलंय. जो तो पथ चुकलेला या गदिमांच्या ओळी या शहरातील बहुतांश वाहनचालकांना लागू पडतात.
हे ही वाचा…तक्रारदाराची तक्रार बंद करताना पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
आपल्याला नियम तोडण्याचा रोग झाला आहे, हेच मान्य न करण्याच्या मानसिकतेवर जबर कारवाईचा बडगा हे उत्तर असू शकते. पण अशी कारवाई करणे तर सोडाच, त्यासाठी पुढाकार करण्याची इच्छा देखील पोलिसांकडे असू नये, हे भयंकर. काही वर्षांपूर्वी पोलीस चौकाचौकात अशी कारवाई करून लागले, तेव्हा नागरिकांना त्याचा राग आला. साहजिकच. नियम मोडण्याच्या आपल्या अधिकाराला असं आव्हान कुणाला आवडेल? शेवटी राजकारण्यांनी मध्यस्थी करत नेहमीप्रमाणे नियम मोडणाऱ्यांचीच बाजू घेतली आणि त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनी रस्त्यावर कारवाई न करता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दिवसाकाठी असे लाखो गुन्हे होत असताना, कितीजणांवर कारवाई होते, हे गूढच. नियम पाळणे हाच गुन्हा वाटणाऱ्या बहुसंख्यांमुळे सामान्यांचं जगणं किडामुंगीसारखं झालंय. अपघातांमुळे आयुष्यभराचे दुखणे सांभाळणाऱ्या किंवा हकनाक मृत्युला सामोरं जावं लागणाऱ्या अशा हजारो निरपराधांना कुणी वाली आहे की नाही? mukundsangoram@gmail.com