पुणे : हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी पार्कची ओळख आता ‘खड्डा पार्क’ अशी बनली आहे. येथील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांचे रोज हाल सुरू आहेत. ही कोंडी सोडविण्याऐवजी शासकीय यंत्रणांकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी आणखी बिकट बनत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये जगातील आणि देशांतील मोठ्या आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. या पार्कमध्ये एकूण २०० आयटी कंपन्या कार्यरत असून, तीन लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. गेल्या काही दिवसांपासून या पार्कमधील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता या पार्कमधील खड्डेमय रस्त्यांमुळे येथील पायाभूत सुविधांचा झालेला बोजवारा समोर आला आहे. खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक रोज एक ते दीड तास कोंडीत अडकून पडत आहेत.

हेही वाचा:कलावंतांची मुस्कटदाबी कितपत योग्य? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे परखड सवाल

आयटी पार्कंमधील कंपन्यांत काम करणारे आयटीयन्स वारंवार येथील खराब रस्त्यांचा मुद्दा समाज माध्यमातून मांडत आहेत. आयटी पार्कमध्ये केवळ ३ किलोमीटरच्या प्रवासाला ३० मिनिटांहून अधिक वेळ लागत आहे. योग्य पदपथ नसल्याने चालणे शक्य नाही. तसेच, सायकल तर चालविणे अशक्य असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हिंजवडीतील खराब रस्त्यांमुळे कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतो. आयटी कंपन्या सरकारकडे पाठपुरावा करून या परिस्थितीत बदल घडवू शकतात का, असा प्रश्नही अनेक जण उपस्थित करीत आहेत.

आयटी पार्कमधील रस्त्यांवरील खड्डे तात्पुरते बुजविण्यात येत आहेत. हे रस्ते दुरुस्तीनंतर दोन दिवसांत पुन्हा उखडत आहेत. पावसामुळे काम करता येत नसल्याचे यंत्रणांचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वी काम केले असते, तर ही वेळ आली नसती. हिंजवडीत नागरी समस्या कायम असून, त्या सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी अद्याप पावले उचललेली नाहीत.

लेफ्टनन्ट कर्नल (निवृत्त) योगेश जोशी, सचिव, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन

हेही वाचा:पुण्यात सभेनंतर मनोज जरांगे पाटील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल

‘एमआयडीसी’चे ‘पीएमआरडीए’कडे बोट

हिंडवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम हिंजवडीतील काही रस्त्यांवर सुरू आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) पत्र पाठवून कान टोचले आहेत. या पत्रात म्हटले आहे, की मेट्रो मार्गिकेखालील रस्त्यांची सध्याच्या पावसात दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषास आम्हाला सामोरे जावे लागत आहे. हिंजवडीतील रस्त्यांवर मेट्रो मार्गिका उभारण्यास परवानगी देताना हे रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी ‘पीएमआरडीए’कडे देण्यात आली. त्यामुळे हे रस्ते तातडीने पूर्ववत करावेत, जेणेकरून नागरिकांचा प्रवास सुखकर होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune people suffering due to potholes in hinjawadi it park pune print news stj 05 css