पुणे : फलटण ते पंढरपूर रेल्वेमार्गाला अखेर गती मिळण्याची चिन्हे आहेत. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी या प्रकल्पाचा नुकताच आढावा घेतला आहे. त्यामुळे लवकरच या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. हा रेल्वेमार्ग १०५ किलोमीटरचा असणार आहे. सरव्यवस्थापक यादवी यांनी फलटण स्थानकाची पाहणी करून भविष्यातील विकास आणि प्रकल्पांच्या सद्य:स्थितीवर नुकतीच चर्चा केली. यावेळी खासदार रणजित नाईक निंबाळकर, उपस्थित होते. यानंतर यादव यांनी लोणंद ते फलटण रेल्वे गाड्यांचा वेग वाढवणे, बहुप्रतिक्षित फलटण ते बारामती विभाग आणि फलटण ते पंढरपूर नवीन मार्गिका सुरू करणे यासह प्रकल्पांबाबत चर्चा केली. नीती आयोगाच्या मंजुरीनंतर पुढील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांचा खर्च एकूण २ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे.
यादव यांनी नीरा नदीवरील पुलाच्या प्रकल्पाची पाहणी केली. हा पूल ७ स्पॅन गर्डर्ससह बांधला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मनमाड कार्यशाळेत पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. तो लवकरच तयार होणार आहे. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट यापूर्वीच देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या पुलाच्या कामाला गती मिळणार आहे. या पाहणीवेळी रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी ((निर्माण) अवनीशकुमार पांडे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, तसेच मुख्यालय आणि पुणे विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.