पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या ६७ वर पोहोचली असून, त्यातील १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २४ जणांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे.
राज्यातील एकूण ५९ रुग्णांपैकी ४३ पुरुष आणि २४ महिला आहेत. पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. पुणे ग्रामीणमध्ये ३९ रुग्ण आढळले असून, पुणे महापालिकेच्या हद्दीत १३, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १२ रुग्ण आहेत. यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या ६४ वर पोहोचली आहे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध आरोग्य विभागाची पथके घेत आहेत.
आरोग्य विभागाने शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन केले आहे. या पथकाने रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांची पाहणी सुरू केली आहे. रुग्णांचे शौचनमुने आणि रक्तनमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर पुण्यातील विविध भागांतील पाण्याचा नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
काळजी काय घ्यावी?
- पाणी पिण्याआधी उकळून घ्या.
- भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खा.
- चिकन आणि मांस व्यवस्थित शिजवून खा.
- अंडी, माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका.
- जेवणाआधी आणि स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवा.
- खाण्याचे भांडे अथवा अन्नाची दुसऱ्याशी देवाणघेवाण करू नका.
- कच्चे अन्न आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवा.
- स्वयंपाकघराचा ओटा आणि भांडी निर्जंतूक करून घ्या.