पुणे : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने घेतला आहे. अतिक्रमण विभागाकडून सध्या या वाहनांवर नोटीस डकविण्यात आली आहे. त्यानुसार सात दिवसांच्या आत वाहने सोडवून न घेतल्यास ती जप्त करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, उपरस्ते, पदपथांवर दुचाकी, मोटारी लावण्यात आल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून वाहने रस्त्याच्या कडेला असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यासंदर्भात नागरिकंकडून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गणेशोत्सवापासून बेवारस वाहने हटविण्याची मोहीम हाती घेतली होती.
हेही वाचा : नवले पूल परिसरात पुन्हा अपघात; टेम्पो उलटून एकाचा मृत्यू
महापालिकेने हटविलेली बेवारस वाहने रिमुव्हल चार्जेस भरून संबंधित वाहन मालकांना एक महिन्याच्या कालावधीत सोडविता येणार आहेत. त्यानुसार या वाहनांवर नोटीस बजाविण्यात आली असून गाड्या सोडविण्याची प्रक्रिया सात दिवसांच्या आत सुरू करावी, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार सात दिवसांत त्याला प्रतिसाद न मिळाल्यास वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. अतिक्रमण निर्मूलन विभागाने आत्तापर्यंत १३९ वाहने जप्त केली असून बेवारस वाहनांसाठी ९६८९९३१९०० या व्हाॅटस्ॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.