पुणे : प्रवासी, शाळा, महाविद्यालये, खासगी कंपन्या यांना त्यांच्या मागणीनुसार वैयक्तिक आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी पीएमपीच्या गाड्या माफक दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. शनिवार आणि रविवारी या दरामध्ये २५ टक्के सवलत देण्याचेही पीएमपी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. नैसर्गिक इंधनावर (सीएनजी) धावणाऱ्या आणि विजेवर धावणाऱ्या या बस (इलेक्ट्रिकल बस- ई-बस) प्रासंगिक करार सुविधेसाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवार ते शुक्रवार या कालावधीत आठ तासांसाठी सीएनजीवरील गाड्या ८ हजार ४६९ रुपये तर ई-बस ९ हजार ९५१ रुपये दराने दिल्या जातील. सोळा तासांसाठी सीएनजी गाडीचा दर १६ हजार ९४० रुपये तर ई-बसचा दर १९ हजार ९०३ रुपये असा असेल. यामध्ये वस्तू आणि सेवा कराचा समावेश करण्यात आला आहे. प्रस्तावित दराच्या ५० टक्के या प्रमाणे सोडणे आणि आणणे या एकेरी खेपेसाठी वस्तू आणि सेवाकरासह सीएनजीसाठी १ हजार २३४ रुपये तर ई-बससाठी ४ हजार ९७५ रुपये आकारले जाणार आहेत.

हेही वाचा : पिंपरी महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘गोड’

शनिवारी आणि रविवारी २५ टक्के सवलतीनुसार आठ तासांसाठी ६ हजार ३५२ रुपये सीएनजी गाड्यांसाठी तर ७ हजार ४६३ रुपये ई-बससाठी प्रस्तावित आहेत. सोळा तासांठी १२ हजार ७०५ रुपये सीएनजी गाड्यांसाठी तर १४ हजार ९२७ रुपये ई-बससाठी आकारले जाणार आहेत. एकेरी खेपेसाठी सीएनजी आणि ई-बस साठी अनुक्रमे ३ हजार १७६ आणि ३ हजार ७३१ रुपये आकारले जातील.