पुणे : नववर्षाच्या मध्यरात्री पोलिसंनी ८५ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. मद्यपान करुन वाहन चालविणे, तसेच भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या २६३३ चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्याकडून २० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणी नाकाबंदी केली. मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, भरधाव वेग, तसेच ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी चौकाचौकात नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी केली. विशेष माेहिमेत वाहतूकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने लावणाऱ्या ९०२जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. हेल्मेट परिधान न केलेल्या २३, सिग्नल न पाळणाऱ्या ११८,विरुद्ध दिशेने वाहन चालविणारे ६३२ आणि परवाना नसताना वाहने चालवणाऱ्या २३ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी; मध्यभागात कोंडी
दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणारे १७६, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्या ४९, धोकादायक पद्धतीने वाहने चालवणाऱ्या ५६ आणि वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या ५५२ जणांविरुद्धही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २६३३ वाहनचालकांना १९ लाख ८१ हजार ४५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
नववर्ष स्वागतासाठी शहर परिसरात तीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात अनुचित घटना घडली नाही. वाहतूक शाखेचे ८०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त