पुणे: पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुले, तसेच काडतुसे जप्त करण्यात आली. साजन विनोद शहा (वय १९), कुणाल शिवाजी पुरी (वय १८, दोघे रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहा आणि पुरी यांच्याविरुद्ध गंभीर गु्न्हे दाखल आहेत.
हेही वाचा : मंत्रिमंडळाचा विस्तार होताच पुण्याबाबत झाला महत्त्वाचा निर्णय
रविवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला धायरीतील अंबाईदरा परिसरात गस्त घालत होते. शहा आणि पुरी यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. दोघांकडून पिस्तूल आणि काडतूल जप्त करण्यात आले. दोघांनी पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.