पुणे : मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) परिसराची पाहणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच केली. त्यानंतर सोमवारपासून (४ मार्च) गणेशखिंड रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठ चौकातून गणेशखिंड रस्तामार्गे सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या उजवीकडे ‌वळण्यास मनाई करण्यात आली आहे. सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना कॉसमॉस बँकेसमोरून वळून सेनापती बापट रस्त्याकडे जावे लागणार आहे. शिवाजीनगरहून गणेशखिंड रस्तामार्गे येणाऱ्या वाहनांना उजवीकडे रेंजहिल्स कॉर्नरकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांना कॉसमॉस बँकेकडून वळून (यू टर्न) रेंजहिल्सकडे जावे लागणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त बोराटे यांनी दिली.

हेही वाचा…महायुतीत मावळचा तिढा कायम, भाजपच्या दाव्याने शिंदे गटात चलबिचल

विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणारा रस्ता ‘बफर रोड’ करण्यात येणार आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत बाणेर रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. दुपारी १२ ते सकाळी ७ पर्यंत विद्यापीठ चौकातून बाणेरकडे वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ यावेळेत विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्तामार्गे अभिमानश्री सोसायटी चौकातून इच्छितस्थळी जाता येईल.

हेही वाचा…मेफेड्रोन विक्रीतील पैसे हवालामार्गे दिल्लीत; पुणे पोलिसांची न्यायालयात माहिती

अवजड वाहनांना २४ तास बंदी

गणेशखिंड रस्त्यावरील चापेकर चौक ते विद्यापीठ चौक दरम्यान २४ तास अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. औंध रस्ता (ब्रेमेन चौक ते विद्यापीठ चौक), बाणेर रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी चौक ते विद्यापीठ चौक या मार्गावर अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. भाजीपाला वाहतूक करणारी वाहने, मालवाहतूक करणारी वाहने, तसेच डंपर, मिक्सर, जेसीबी, रोड रोलर अशा वाहनांना सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री दहापर्यंत बंदी राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune police commissioner visited metro work and ordered on experimental basis traffic changes on ganeshkhind road pune print news rbk 25 psg