पुणे : आभासी चलन प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. गेल्या आठवडाभरापासून पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोपनीय चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडून मोबाइल संच, लॅपटाॅप, अन्य इलेक्ट्राॅनिक साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही चौकशी सुरू नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
आभासी चलन प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह चौघांना दररोज सकाळी चौकशीसाठी बोलाविण्यात येत आहे. या प्रकरणात लेखापरीक्षण करणाऱ्या एकाला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, तसेच पोलीस निरीक्षकाकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आभासी चलन फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह एका संगणकतज्ज्ञाला अटक केली होती. आभासी चलन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेले आभासी चलन संगणकतज्ज्ञ आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्या खात्यात वळविले होते. तपासात या बाबी उघडकीस आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. सायबरतज्ज्ञाने आरोपींकडून जप्त केलेले ६० बिटकाॅईन स्वत:च्या खात्यात वळविले होते. जप्त केलेल्या बिटकाॅईनचे मूल्य २० कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
हेही वाचा : “मी ‘त्या’ लोकांना सोडून जाणार नाही”, आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला
आभासी चलन फसवणूक प्रकरण नेमके काय ?
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने अमित भारद्वाज आणि त्याचा भाऊ विवेक यांनी देशभरातील अनेकांची फसवणूक केली होती. २०१८ मध्ये दोघांविरुद्ध पुण्यातील दत्तवाडी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारद्वाजसह १७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २४१ बिटकाॅईन जप्त करण्यात आले. राज्य आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत पुन्हा आदेश दिले होते. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने पुन्हा तपास सुरू केला. पोलिसांनी तपासासाठी सायबरतज्ज्ञासह निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची मदत घेतली. त्यापैकी एका आरोपीने आरोपींच्या वाॅलेटमधील ६० बिटकाॅईन स्वत:च्या वाॅलेटमध्ये वळविले हाेते. तपासात ही बाब उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.