पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण ताजे असतानाच पुणे शहर, जिल्ह्यात गेल्या वर्षभरात पोलिसांनी १४ कोटी ५५ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस, तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणात ५०४ आरोपींना अटक केली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने अमली पदार्थ विक्री, तसेच तस्करांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी केंद्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत पोलीस अधीक्षक, उपवनसंरक्षक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जिल्हा कृषी अधिकारी, वस्तू आणि सेवा कर विभागाचे आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी, अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युराेचे अधीक्षक, पुणे, पिंपरी शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीची बैठक दरमहा घेण्यात येते.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आयटी पार्क निर्मितीचा ‘संकल्प’? मोशी, चऱ्होली, चिखलीचा समावेश
पुणे शहर, जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, तस्करी रोखण्यासाठी या समितीकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस तसेच सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या दहा महिन्यात पुणे शहर, जिल्हा, आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत पोलिसांनी ४०९ कारवाया केल्या. या कारवाईत नऊ हजार ३५५ किलो ६८ ग्रॅम वजनाचे १४ कोटी ५५ लाख ३४ हजार २२३ रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ५०४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाई, शंभूराज देसाई यांची स्पष्टोक्ती
अन्न आणि ओैषध प्रशासनाकडून ओैषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अमली पदार्थ विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी त्वरीत नजीकचे पोलीस ठाणे किंवा अमली पदार्थ विरोधी समितीतील सदस्यांकडे माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.