पुणे : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शहरातील प्रमुख राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात आला. यानिमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) वतीने श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. तर, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून आंदोलन करण्यात आले.
शहर भाजपच्या वतीने लोकमान्य टिळक चौकात (अलका टाॅकीज) शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील. देशातील जनतेने एकजुटीने या दोघांच्या पाठीशी उभे रहावे, असे घाटे यांनी सांगितले. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे या वेळी उपस्थित होते.
शिवसेनेच्या (शिंदे) वतीने स्वारगेट चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी दहशतवाद्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली. या भ्याड हल्ल्याचा बदला केंद्र सरकार घेईल, असे या वेळी शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी सांगितले. जिल्हा उपप्रमुख अमर घुले, पंकज कोंद्रे, सुदर्शना त्रिगुणाईत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसच्या वतीने झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. ज्या ठिकाणी पर्यटक गेले होते तेथे सुरक्षा व्यवस्था नव्हती, याचाच फायदा अतिरेक्यांनी घेतला. पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी या हल्ल्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई केली पाहिजे, असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले. मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक रफिक शेख आदी या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित श्रद्धांजली वाहण्यात आली. कात्रज येथे श्रद्धांजली सभा घेण्यात आली. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी केंद्राच्या प्रयत्नांना पक्षाचा पाठिंबा आहे. पण देशात धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, माजी नगरसेवक विशाल तांबे, स्वाती पोकळे उपस्थित होते.
शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांच्यासह रामभाऊ पारीख, शहर संघटक राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.