पुणे : पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या बदलीवरून शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. हितसंबंध जपणे हाच या बदलीमागील हेतू आहे. त्यासाठी अध्यक्षपदाच्या खुर्चीचा संगीतखेळ सुरू आहे, असा आरोप राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीएमपीचे अध्यक्ष सचिन्द्र प्रताप सिंह यांची तीन महिन्यांच्या कालावधीत बदली करण्यात आली आहे. गेल्या १६ वर्षांत २० अध्यक्ष पीएमपीला लाभले आहेत. या पार्श्वभूमीवर या बदलीवरून काँग्रेसचे माजी आमदार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आणि भाजपचे माजी सभागृहनेते उज्ज्वल केसकर यांनी टीका केली आहे.

हेही वाचा : पुणे : आयनावरणातील बदलांचा ‘जीएमआरटी’च्या साहाय्याने वेध; शास्त्रज्ञांचे संशोधन

भाजपच्या नेत्यांचे हितसंबंध यातील खरेदी-विक्रीमध्ये दडलेले असल्याने शिस्तप्रिय अधिकाऱ्यांना बदलले जात आहे. भाजपने पुण्याला नेहमीच दुय्यम वागणूक दिली असून, पीएमपीएमएल कडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यामागे हेच कारण असल्याचा आरोप मोहन जोशी यांनी केला. यापूर्वी ओमप्रकाश बकाेरिया या प्रामाणिक अधिकाऱ्याची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आली होती.

हेही वाचा : चांदणी चौकातील नवीन रस्त्यावर खड्डे? तीन महिन्यांतच झाली रस्त्याची दुरवस्था

सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम व्हायला हवी, असे भाजप नेते भाषणांमधून सांगत असतात, प्रत्यक्षात कृती मात्र सार्वजनिक सेवेला दिशाहीन करणारी आहे, असे जोशी यांनी सांगतिले. केसकर म्हणाले की, पीएमपी अध्यक्षांची सतत बदली होत असते. दर चार-पाच महिन्यांनी नवा अधिकारी येतो. अध्यक्षपदासाठी संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण डबघाईस आली असताना आणि चांगले अधिकारी ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची बदली केली जाते. हा प्रकार टाळण्यासाठी पीएमपी मेट्रोची अनुदानित कंपनी म्हणून वर्ग करावी. महामेट्रो आणि पीएमपी कंपनी आहे. मात्र पीएमपीचे व्यवस्थापन कायद्याच्या अधीन राहून होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए पीएमपीचा तोटा भरून काढत आहे. त्यामुळे पीएमपी पांढरा हत्ती ठरत आहे. त्यामुळे मेट्रोचा भाग म्हणून पीएमपी वर्ग करावी. त्यातून सार्वजनिक व्यवस्था सक्षम होईल, असे केसकर यांनी स्पष्ट केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune politics raised after transfer of pmp president and md sachindra pratap singh pune print news apk 13 css