पुणे : शहरी गरीब योजनेंतर्गत पूना हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आठ तासांनी मृतदेह ताब्यात दिल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नातेवाइकांनी तक्रार केली आहे. पूना हॉस्पिटलमध्ये महेश पाठक (वय ५३, शुक्रवार पेठ) उपचार घेत होते. त्यांचा २५ एप्रिलला रात्री १.३० वाजता मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. त्या वेळी त्यांना देयक (बिल) विभागात पाठविण्यात आले. ‘रुग्णावर शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचार सुरू असल्याने त्यांचा मृतदेह सकाळी ८.३० वाजता नेता येईल, असे देयक विभागातील कर्मचाऱ्याने सांगितले. ‘आत्ता देयक तयार करण्यास कोणी नसते, तुम्ही सकाळी या,’ असे सागंण्यात आले,’ असे रुग्णाचे नातेवाइक व अग्निशामक विभागाचे अधिकारी नीलेश महाजन यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
‘सकाळी ८.२० वाजता नातेवाइक रुग्णालयात गेले. त्यानंतर ८.४५ वाजता देयक विभागातील कर्मचारी आले. ‘वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत, ९.३० वाजेपर्यंत थांबावे लागेल,’ असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. नातेवाइकांनी रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना भेटू देण्याची विनंती केली. मात्र, दोन्ही अधिकारी १० वाजता येतात, असे सांगण्यात आले. अखेर सकाळी ९.३० वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याचबरोबर देयक विभागाने ७ हजार रुपयांची परताव्याची रक्कम द्यायची आहे, असेही नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे केवळ देयकावर प्रक्रिया करण्यासाठी मृतदेह आठ तास रोखून ठेवण्यात आल्याने रुग्णालयावर कारवाई करावी,’ असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
योग्य संवाद न झाल्याचे
या प्रकाराबाबत पूना हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकारी रेणू कटारे म्हणाल्या, ‘या रुग्णाचा मृत्यू रात्री १.३० वाजता झाला. सर्वसाधारणपणे रात्री उशिरा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइक मृतदेह सकाळीच नेतात. त्यामुळे रुग्णालयातील देयक विभाग रात्री सुरू नसतो. रुग्णालयात रात्रीच्या वेळी आपत्कालीन विभागातील कर्मचारी अंदाजे देयक करतात. त्यांनी अंदाजे देयकाची रक्कम नातेवाइकांना सांगितली. ती भरून नातेवाईक मृतदेह घरी घेऊन जाऊ शकले असते. मात्र, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये योग्य संवाद न झाल्याने हा प्रकार घडला.’
रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने याप्रकरणी चौकशी केली जाईल. सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे रुग्णालयावर योग्य ती कारवाई केली जाईल.
डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका