पुणे : शहराच्या पश्चिम भागातील सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेल्या चांदणी चौकातील रस्त्याची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांदणी चौकापासून मुळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डा पडल्याचा आरोप समाजमाध्यमातून केला आहे. अवघ्या तीन महिन्यांतच नव्या रस्त्याची दुरवस्था होत असल्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
चांदणी चौक आणि कोथरूड परिसरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने उड्डाणपूल प्रस्तावित केले होता. मात्र, महापालिकेच्या आराखड्यात काही तांत्रिक चुका असल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलाचा आराखडा केला. केंद्रीय रस्ते आणि विकास मंत्रालयाकडून या उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटींचा निधी जाहीर केला होता. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तेच सात वर्षांपूर्वी उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर मात्र वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावर उड्डाणपुलाचे काम रखडले आणि १२ ऑगस्ट रोजी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, तीन महिन्यांच्या कालावधीतच रस्त्याची दुरवस्था होण्यास सुरुवात झाल्याने रस्त्याच्या कामाबाबात सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा : काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी पुणे दौर्यावर
हेही वाचा : पुणे महापालिका उभारणार हडपसरमध्ये श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा
चांदणी चौकातून एनडीएपासून मुळशीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावरील खड्डा पडल्याचे छायाचित्र त्यांनी समाजमाध्यमातून प्रसारित केले आहे. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने कामाचा दर्जा तपासण्याची गरज असून, त्यामुळे वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. यासंदर्भात सुळे यांनी केंद्रीय मत्री नितीन गडकरी संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.