पुणे : महावितरणने थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली असून, पुणे परिमंडलातील २५ हजार ४३४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या २४ दिवसांत खंडित करण्यात आला आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे ८८ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

महावितरणची आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच आहे. वीजबिलांच्या वसुलीमधून वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली असून थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांकडे ४० कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २४ दिवसांमध्ये १० हजार १७७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १८ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ७९६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे २९ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ४६१ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या २४ दिवसांत खंडित करण्यात आला असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

मुख्य अभियंता राजेंद्र पवार परिमंडलातील विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्याअवीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी अधीक्षक अभियंते युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते आणि कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत, असेही महावितरणतर्फे सांगण्यात आले.

घरबसल्या वीजबिल भरण्याची सुविधा

लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी http://www.mahadiscom.in या वेबसाइट व मोबाइल ॲपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.