पुणे : जैवइंधन निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात अन्न विरुद्ध इंधन असा वाद निर्माण झाला होता. इंधनासाठी अन्नाचा वापर करण्याला त्यावेळी विरोध झाला होता. आता हा वाद मागे पडला आहे. कारण शेतीतील वाया जाणाऱ्या घटकांचा वापर करून जैवइंधन निर्मिती होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे, असे मत प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘अर्थ जर्नालिझम नेटवर्क’ आणि ‘इंटरन्यूज’ या संस्थांच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील बीजभाषणात डॉ. चौधरी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, प्राज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष रवींद्र उटगीकर, ज्येष्ठ पर्यावरण पत्रकार जॉयदीप गुप्ता, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर आदी उपस्थित होते. चौधरी म्हणाले की, जैवऊर्जा, जैवइंधनाकडून आपण आता जैववहनशीलकडे वळत आहोत. वाहतुकीच्या साधनांसाठी जैवइंधनाचा वापर केला जात आहे. नुकतेच आम्ही जैव शाश्वत विमान इंधन सादर केले. या इंधनावर विमानाचे यशस्वी उड्डाणही नुकतेच झाले. त्यामुळे हवेत उडणारे विमान पाहून आता शेतकरीही म्हणू शकतो की हे विमान माझ्या इंधनावर धावत आहे.
हेही वाचा : VIDEO : “निखिल वागळेंवर हल्ला करणारे कुत्रे होते की…”, रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल
उत्तर भारतात शेतातील पालापाचोळा जाळल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या हवा प्रदूषणाची नेहमी चर्चा होत असते. यावर उपाय काढण्यासाठी या पालापाचोळ्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रस्ताव समोर आला. आम्ही इंडियन ऑईलसोबत शेतातील पालापाचोळ्यापासून इथेनॉल उत्पादनाचा प्रकल्प पानिपत येथे सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत मिळणार आहे. याचवेळी पालापाचोळा जाळल्यामुळे निर्माण होणारी प्रदूषणाची समस्याही कमी होण्यास मदत होणार आहे, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लावला थेट वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना फोन, ‘आपले काम…’
काय आहे ‘अर्थ जर्नालिझम नेटवर्क’?
विकसनशील देशांमधील पत्रकारांना पर्यावरणविषय पत्रकारिता अधिक प्रभावीपणे करता यावी, यासाठी ‘अर्थ जर्नालिझम नेटवर्क’ काम करते. यात १८० देशांतील २० हजारांहून अधिक सदस्यांचा समावेश आहे. पर्यावरणाशी निगडित गोष्टींचे वार्तांकन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजनही संस्थेमार्फत केले जाते. याचबरोबर पर्यावरण विषयात काम करण्यासाठी पाठ्यवृत्तीही दिली जाते.