पुणे : ब्रिटनमधील ॲस्ट्राझेनेका कंपनीने त्यांच्या करोनावरील लशीमुळे थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) दुष्परिणाम होऊ शकतात, असे म्हटले आहे. याच कंपनीची करोनावरील लस कोव्हिशिल्ड या नावाने भारतात देण्यात आली. त्यामुळे गदारोळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य कोविड कृती दलाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
ॲस्ट्राझेनेका कंपनीने ब्रिटनमधील न्यायालयात करोना लशीवरील दुष्परिणामांची कबुली दिली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीशी भागीदारी करून ही लस विकसित करण्यात आली होती. भारतात सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड नावाने ही लस उत्पादित केली. देशातील बहुतांश नागरिकांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. टीटीएस ही दुर्मीळ आणि अतिशय गंभीर स्थिती मानली जाते. यात व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात. या गुठळ्या मेंदूत आणि पोटात होतात.
हेही वाचा: तीन दिवस उष्णतेच्या लाटेचे; जाणून घ्या मुंबईसह मध्य महाराष्ट्रात काय होणार?
ॲस्ट्राझेनेकाच्या कबुलीनंतर गदारोळ उडाला आहे. आपल्यालाही हे दुष्परिणाम जाणवतील, अशी भीती कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोविड कृती दलाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, कुठलीही लस अथवा औषधाचे दुष्परिणाम असतात. कोव्हिशिल्डमुळे १० लाखांपैकी ८ जणांना हे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट अवघड का होता? रणदीप हुडा यांनी सांगितले कारण…
कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुष्परिणाम जाणविण्याचा धोका जास्त होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसनंतर तो कमी होत गेला. एवढ्या कालावधीनंतर तर धोका आणखी कमी झाला आहे. एखाद्या व्यक्तीला लशीचे दुष्परिणाम जाणवले म्हणजे त्याचा मृत्यू होत नाही. योग्य उपचारानंतर तो बरा होऊ शकतो. लशीच्या दुष्परिणामाची चर्चा सुरुवातीलाही होती. परंतु, त्यापासून होणारा फायदा जास्त असून, त्यामुळे वाचलेले जीव महत्त्वाचे आहेत, असेही डॉ. गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील करणार घरुन मतदान
कोव्हिशिल्ड लशीमुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे करोनापासून संरक्षण झाले. प्रत्येक औषधाचे काही दुष्परिणाम असतात. कोव्हिशिल्डचे दुष्परिणाम जाणविण्याची शक्यता आता अतिशय कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
डॉ. रमण गंगाखेडकर, अध्यक्ष, राज्य कोविड कृती दल