पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. लोकेश राजकुमार पुरी (वय २३, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील सहायक फौजदार छाया जाधव यांनी खराडी (चंदननगर) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आयुक्तांना आदेश, गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीचा मुद्दा
पोेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील राजाराम पाटीलनगर परिसरात एका इमारतीत मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मसाज पार्लरच्या नावाखाली आरोपी पुरीने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत. शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे केल्या होत्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मसाज पार्लरवर कारवाईचे आदेश दिले आहेत.