पुणे : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटकपक्षांमध्ये कुरबुरी सुरू असतानाच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर कुरघोडी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पवार यांचे प्राबल्य असलेल्या पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांची महसूल मंत्रालयातील विशेष निरीक्षण पथकाकडून अचानक तपासणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. संबंधित विशेष पथक पुण्यात डेरेदाखल झाले असून, ही तपासणी १६ ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक, पुणे शहर आणि ग्रामीण मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग यांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व महसूल कार्यालयांची तपासणी होणार आहे. त्यासाठी महसूल व वन विभागाचे सहायक संचालक रवींद्र खेडकर आणि सहायक लेखा अधिकारी जितेंद्र ढाकणे यांचे मंत्रालयीन विशेष पथक पुण्यात डेरेदाखल झाले आहे. या पथकाकडून महालेखापालांकडील अंतर्गत लेखापरीक्षण पथकाकडील प्रलंबित लेखा आक्षेप, प्रलंबित अपील प्रकरणे, प्रलंबित तपशीलवार देयके व इतर बाबींचा आढावा आणि पुनर्विलोकन होणार आहे.
हेही वाचा : ‘आरटीई’ प्रवेशात नवी अडचण; वाढीव जागांच्या परवानगीचे कारण देत काही खासगी शाळांचा नकार
रोकड पडताळणी, सर्व रोखवह्या, अखर्चित रक्कम गोषवारा, अद्ययावत बँक व्यवहारांच्या नोंदी, जमा खर्च ताळमेळाची सद्य:स्थिती, सक्षम प्राधिकाऱ्यांनी वगळलेल्या किंवा अमान्य केलेल्या लेखा आक्षेपांचे पुनर्विलोकन, अफरातफर प्रकरणे, मुदतबाह्य प्रलंबित प्रकरणे, प्रलंबित मोजणी प्रकरणे, वन गुन्हे, कायमस्वरुपी प्रमाणकांची प्रलंबित वसुली, महसूल जमा अभिलेखे व जमा चलने, जडसंग्रह नोंदवही आदींची अचानक तपासणी होणार आहे. तपासणीवेळी ज्या कार्यालयांची माहिती पथकाला विनाविलंब होणार नाही, त्यांना संबंधित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पथकाला सादर करावी लागेल. अन्यथा संबंधित माहिती महसूल सहसचिवांकडे मंत्रालयात समक्ष हजर राहून सादर करावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विशेष पथकाची तपासणी अशी होईल
३० जुलै – पुणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या अधीनस्त सर्व दस्त नोंदणी कार्यालये
३१ जुलै – मावळ, मुळशी
१ ऑगस्ट – खेड-राजगुरुनगर आणि आंबेगाव
२ ऑगस्ट – जुन्नर, उप वनसंरक्षक, जुन्नर (प्रादेशिक)
३ ऑगस्ट – उप वनसंरक्षक, जुन्नर (प्रादेशिक)
५ ऑगस्ट – हवेली, पुणे शहर
६ ऑगस्ट – भोर, वेल्हे
७ ऑगस्ट – बारामती, इंदापूर
हेही वाचा : पुण्यात पुरानंतर आजारांचा धोका! जलजन्यसह कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे
८ ऑगस्ट – दौंड, शिरूर
९ ऑगस्ट – सासवड, पुरंदर आणि उपविभागीय अधिकारी शिरूर आणि पुणे शहर
१२ ऑगस्ट – उप वनसंरक्षक, पुणे (प्रादेशिक/ वन्यजीव)
१३ ऑगस्ट – विभागीय वन अधिकारी, पुणे सामाजिक वनीकरण
१४ ऑगस्ट – जिल्हा अधीक्षक/ नगर भूमापन अधिकारी/ उपअधीक्षक भूमी अभिलेख
१६ ऑगस्ट – पुणे शहर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व इतर कार्यालये