पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी तक्रारीची सुनावणी आता ‘एमपी एमएलए’ या विशेष न्यायालयात होणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी होणार असून,जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींविरुद्ध दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यातील प्रकरणांची सुनावणी जलदगतीने व्हावी यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा व सत्र न्यायालयात ‘एमपी एमएलए’ हे विशेष न्यायालय नुकतेच स्थापन करण्यात आले आहे.

गांधी यांच्याविरुद्ध तक्रारीची सुनावणी विशेष न्यायालयात घेण्याबाबतचे आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी दिले आहेत. गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गांधी यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा आदेश देण्यात आला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.

हेही वाचा : Horticulture Production : देशात फलोत्पादन उत्पादनात घट ? जाणून घ्या, फळे, भाजीपाल्याच्या उत्पादनाचा अंदाज

‘एमपी एमएलए’ न्यायालय म्हणजे काय ?

कोणत्याही जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्याविरोधात फौजदारी संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि पुनराविलोकन याचिका (रिट पिटीशन (क) क्र ६९९, २०१६) अंतर्गत दाखल सर्व दावे विशेष न्यायालयात चालविले जातील, अशी अधिसूचना उच्च न्यायालयाने काढली होती. त्यानुसार या न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष न्यायालयात सर्व आजी, तसेच माजी खासदार आणि आमदारांचे फौजदारी दावे चालविले जाणार आहेत.

हेही वाचा : Maharashtra Rain : कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत कसा पाऊस पडणार

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधान प्रकरणात दाखल फौजदारी दाव्याची पुढील सुनावणी विशेष न्यायालयात होणार आहे. पुढील सुनावणीच्या तारखेपूर्वी विशेष न्यायालय राहुल गांधी यांना समन्स पाठवणार आहेत. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या तारखेस राहुल गांधी यांना विशेष न्यायालयासमोर उपस्थित राहावे लागेल.

ॲड. संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे वकील