पुणे : लोणी काळभोर परिसरात सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी रोकड, तसेच जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरात बेकायदा मटका अड्डा सुरू असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसाांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी जुगार अड्ड्याचा चालक दत्तात्रय नवनाथ मोहोळकर (वय ५९, रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली), तात्याराम महादेव ससाणे (वय ५१, रा. माळी मळा, ता. हवेली) यांंना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जुुगाराचे साहित्य, तसेच १७६५ रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या एका कारवाईत लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर पुलाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ६० हजारांची रोकड आणि जुगाराचे साहित्य असा ८२ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जुगार अड्ड्याचा चालक राजाभाऊ शेषराव मुसळे (वय ४०, रा. थेऊर, ता. हवेली) आणि राम राजेंद्र गिरे (वय ३६, रा. गाढवे मळा, कुंजीरवाडी, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली.

पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, महेश चव्हाण, रवी आहेर, मल्हार ढमढेरे, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ यांनी ही कामागिरी केली.