पुणे : मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पुणे विभागात या मोहिमेअंतर्गत दोन तिकीट तपासनीसांनी चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांत प्रत्येकी एक कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्याची कामगिरी केली आहे. नितीन तेलंग आणि रुपाली माळवे अशी त्यांची नावे असून, रेल्वेच्या वतीने त्यांचा बुधवारी सन्मान करण्यात आला. नितीन तेलंग हे मुख्य रेल्वे तिकीट तपासनीस तर रुपाली माळवे या वरिष्ठ तिकीट तपासणीस आहेत.
चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत तेलंग यांनी फुकट्या प्रवाशांकडून १ कोटी ६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. याच कालावधीत माळवे यांनी फुकट्या प्रवाशांकडून १ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोन्ही तिकीट तपासणीसांचा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या हस्ते बुधवारी सन्मान करण्यात आला. या वेळी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहनही रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा : इंद्रायणी, पवना घेणार मोकळा श्वास… घेतला ‘हा’ मोठा निर्णय
फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा दंडुका
पुणे विभागात डिसेंबरमध्ये तिकीट तपासणीदरम्यान १६ हजार २२ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १ कोटी १८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच, ६ हजार ३०८ प्रवाशांवर अनियमित प्रवासासाठी कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३७ लाख ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सामानाची नोंदणी न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १९९ प्रवाशांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मागील महिन्यात पुणे विभागाने एकूण १ कोटी ५६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.