पुणे : लोकसभा निवडणुकीमुळे उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सध्या प्रचंड गर्दी आहे. उत्तर भारतातील स्थलांतरित कामगार मतदानासाठी मूळ राज्यात जात असल्याने गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दी कमी करण्यासाठी गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. असे असले तरी प्रवाशांची संख्या दुपटीहून अधिक झाल्याने तिकीट विक्री थांबविण्याचे पाऊल रेल्वे प्रशासनाला उचलावे लागत आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून एप्रिल ते जून या कालावधीत विशेष गाड्यांचा २४६ फेऱ्यांचे नियोजन आहे. यातील सुमारे ९० टक्के पुणे स्थानकातून सुटणाऱ्या अथवा येणाऱ्या आहेत. उत्तरेतील राज्यांतील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार पुण्यात आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे मतदानासाठी ते मूळ राज्यात परत जात आहेत. त्यांची गर्दी गाड्यांना वाढली आहे. त्यातच उन्हाळी सुट्यांमुळेही गाड्यांना गर्दी वाढली आहे. रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या वाढविण्यात आली असली तरी या गाड्यांमध्ये प्रवाशांना बसण्यासही जागा नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा :पिंपरी: श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी स्थलांतरित कामगारांना एकत्रपणे तिकीट काढून एकगठ्ठा घेऊन जात आहेत. विशेष गाड्यांची तिकीट विक्री करताना क्षमतेच्या दुप्पट तिकीट विक्री केली जाते. त्यानंतर गाड्यांमध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून त्या गाडीची तिकीट विक्री थांबविली जाते. तिकीट विक्री थांबविल्यानंतरही प्रवासी गाड्यांमध्ये विनातिकीट घुसत आहेत. त्यामुळे या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. अनेक गाड्यांमध्ये तपासणी करण्यासाठी तिकीट तपासनीसही आतमध्ये जाऊ शकत नसल्याची परिस्थिती अनेक वेळा येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानामुळे उन्हाळी विशेष गाड्यांना मोठी गर्दी दिसून येत आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक तैनात करण्यासोबत तिकीट तपासनीसांची संख्याही वाढविण्यात आली आहे. स्थानकातील गर्दीवर लक्ष ठेवून तातडीने उपाययोजना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केल्या जात आहेत.
डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे
हेही वाचा :वसंत मोरे यांच्याकडे आहेत अनेक गाड्या, सोने आणि चांदी
गर्दीचे नियोजन करण्यासाठी उपाययोजना
- रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रणाची व्यवस्था
- स्थानकातील गर्दीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सातत्याने लक्ष
- चेंगराचेंगरी टाळण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात
- प्रवाशांच्या नियमनासाठी अतिरिक्त तिकीट तपासनीस
- गाडीच्या क्षमतेपेक्षा कमाल दुप्पट तिकीट विक्री
- रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता