पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (२६ सप्टेंबर) एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मैदानावर तयारी सुरू आहे. पण, मंगळवारी झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे. चिखल झालेल्या ठिकाणी उत्खनकाच्या मदतीने मुरून टाकला जात आहे. पुढील दोन दिवस म्हणजे बुधवारी, गुरुवारीही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. पण, मोदींच्या सभेवर पावसाचे सावट आहे. पावसाचा जोर वाढल्यास लोकांच्या उपस्थितीवर परिणाम होणार आहे.

शहर, उपनगराला सलग दुसऱ्या दिवशी झोडपले

शहर आणि उपनगरात सलग दुसऱ्या वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. भर दुपारीच जोरदार पाऊस झाल्यामुले जनजीवन विस्कळीत झाले होते. कमी काळात मुसळधार पाऊस झाल्यामुळे रस्ते जलमय होऊन वाहन चालकांची तारांबळ उडाली. पुणे शहर आणि उपनगरात सलग दोन दिवसांपासून वादळी वारे, मेघगर्जनेसह दमदार पाऊस होत आहे. अचानक होणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत तापमानात वाढ झाली होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणे जलमय झाली होती. सखल भागात साचलेल्या पाण्यातून दुचाकी वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. शहराच्या विविध भागात मेट्रो, उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे अगोदरच होत असलेल्या वाहतूक कोंडीत पावसामुळे भर पडली. वाहतूक संथगतीने सुरू होती. सायंकाळी साठेआठपर्यंत शिवाजीनगरमध्ये १९.२, लोहगाव ३९.६, चिंचवड ११.५, लवळे १७.५ आणि मगरपट्ट्यात १२.० मिलिमीटर पाऊस झाला.

हेही वाचा : राज्यभरातील प्राथमिक शिक्षक उद्या आंदोलनासाठी रजेवर… शाळा बंद राहणार?

बुधवारी पावसाचा जोर वाढणार

हवामान विभागाने बुधवारी (२५ सप्टेंबर) पुणे जिल्ह्याला लाल इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या घाट परिसरात पावसाचा जोर राहणार आहे. शहर आणि उपनगरातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. प्रामुख्याने शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून वादळी वारे, मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.