पुणे : छत्तीसगडपासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. या पोषक स्थितीचा परिणाम म्हणून राज्यात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार पुण्यात पाऊस सुरू झाला आहे.
पुण्यात लक्ष्मी रस्त्यासह सर्व प्रमुख मार्गांवर विसर्जन मिरवणूक सकाळपासून उत्साहात सुरू झाली. रांगोळी, बँड-ढोलताशांचे वादन, मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर आलेले पुणेकर असा उत्साही माहोल सकाळपासून पाहायला मिळाले. सकाळपासून असलेले स्वच्छ वातावरण दुपारपासून ढगाळ होण्यास सुरुवात झाली. तीन वाजल्यापासून ढगांचा गडगडाट होऊ लागला. साडेतीन वाजल्यापासून पुण्याच्या विविध भागांमध्ये पाऊस सुरू झाला आहे.
हेही वाचा : ‘ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका…’ पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत अनोखी पुणेरी पाटी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वाहणारे वारे, विजा आणि मेघगर्जनांसह पावसाच्या काही जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर ढोलताशाच्या तालावर नाचण्याचा आनंद पुणेकर घेत आहेत.