पुणे : शहर आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांना ठिकठिकाणी रस्त्यावरील पाण्याचे आणि वाहतूक कोंडीचे दर्शन झाले. नाल्यांची अर्धवट साफसफाई, सततची रस्ते खोदाई, मेट्रो आणि उड्डाणपुलांच्या कामांमुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने बहुतांश रस्ते जलमय झाले. त्याचा फटका वाहतुकीला बसला. पावसाने वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडल्याने अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. शहरात शुक्रवारी दुपारी चारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला.

तासभर कोसळलेल्या पावसामुळे पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पावसामुळे अनेक चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. सध्या गणेशोत्सवामुळे वाहतूक मार्गात काही ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे प्रमुख रस्त्यांलगच्या गल्ली-बोळातून वाहनचालकांनी वाट काढण्याचा प्रयत्न केला. कार्यालये सुटण्याच्या वेळी झालेल्या पावसामुळे नोकरदारांची मोठी धावपळ उडाली.

हेही वाचा : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून राजकारण…’या’ राजकीय नेत्यांचा अडथळा

फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, टिळक रस्ता, सातारा रस्ता, शंकरशेठ रस्ता, ससून रस्ता, नगर रस्ता, बंडगार्डन रस्त्यावरील वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. रात्री आठनंतर वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली. पावसाळा पूर्व कामाअंतर्गत नाल्यांची सफाई आणि पावसाळी वाहिन्या तसेच गटारांची स्वच्छता केल्याचा दावा महापालिका प्रशासनकडून करण्यात आला होता. पावसाळी वाहिन्या, गटारांची स्वच्छता नीट प्रकारे न झाल्याने अनेक रस्त्यांवर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या.

हेही वाचा : पुणे : सिंहगडावर आता ‘सिग्नेचर वाॅक’

पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कोलमडली. त्यामुळे काही ठिकाणी वाहनेही बंद पडण्याचे प्रकार घडले. दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांबरोबर यंदा कोथरूड कचरा भूमी, पौड रस्ता, सातारा रस्ता, स्वामी विवेकानंद चौक, धानोरी-लोहगाव रस्ता, विमाननगर चौक येथे पाणी साचल्याचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पुणेकरांना रस्त्यावरील पाण्याचे आणि वाहतूक कोंडीचे दर्शन झाले.

Story img Loader