सोशल मीडियावर हल्ली व्यक्त होणाऱ्यांची संख्या वाढली असून लोकांच्या व्यक्त होण्यावर आता पैसे आकारायला हवे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. पुण्यात सुरू असलेल्या १८व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिलं.
काय म्हणाले राज ठाकरे?
या मुलाखती दरम्यान, राज ठाकरेंना २०१८-१९ नंतर व्यंगचित्र का काढली नाहीत? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “व्यंगचित्र काढल्यानंतर ते सोशल मीडियावर टाकणं मला आवडत नाही. मी सुरुवातीला प्रिंट मीडियात काम केलं आहे. त्यामुळे सकाळी वृत्तपत्रात छापून येणाऱ्या व्यंगचित्राची जी मजा आहे, ती सोशल मीडियावर नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“पण त्याला व्यंगचित्र कळतं का?”
पुढे बोलताना त्यांनी सोशल मीडिया वापरणाऱ्यांची फिरकीही घेतली. “ ”मला कोणती तरी एकदा व्यंगचित्राखाली लोकांनी केलेल्या कमेंट दाखवल्या होत्या. त्याखाली अनेकांनी ‘जय मनसे’, ‘जय महाराष्ट्र साहेब’ अशा कमेंट केल्या होत्या. पण त्याला व्यंगचित्र कळतं का? असे ते म्हणाले. यावेळी सभागृहात हशा पिकला होता.
“सोशल मीडियावरील व्यक्त होण्यावर पैसे आकारावे”
यावेळी त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होण्यावर पैसे आकारण्यात यावे, इच्छा व्यक्त केली. “ ”हल्ली सोशल मीडियावरील व्यक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जो तो तिथे व्यक्त होतो आहे. खरं तर आता या व्यक्त होण्यावर पैसे आकारायला हवे. त्यामुळे किमान व्यक्त होणं कमी होईल, असे ते म्हणाले.