पुणे : हरित इंधन पर्यायांचा वापर करण्यावर बजाज समूहाचा भर आहे. त्यामुळे जगात सर्वप्रथम सीएनजीवर चालणारी दुचाकी समूहाने आणली. भविष्यात कॉम्प्रेस्ड बायो गॅसवर (सीबीजी) चालणारी दुचाकी सादर करण्यात येईल, अशी माहिती बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी शुक्रवारी दिली.
आगामी राष्ट्रीय दुग्ध दिनाच्या पार्श्वभूमीवर अमूलच्या वतीने स्वच्छ इंधन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. बजाज ऑटोच्या आकुर्डीतील उत्पादन प्रकल्पातून या फेरीला झेंडा दाखविण्यात आला. यात बजाजच्या सीएनजी दुचाकींचा समावेश असून, ही फेरी दिल्लीला जाणार आहे. यावेळी अमूलचे संस्थापक वर्गीस कुरियन यांच्या कन्या निर्मला कुरियन, अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Sanjay Raut: १७ तारखेला शिवतीर्थावर सांगता सभा होणार – खासदार संजय राऊत
बजाज म्हणाले की, संशोधन आणि नाविन्याचा हेतू हा सामान्य नागरिकांच्या आयुष्यात सुधारणा करण्याचा असावा. कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच एआयचा आता सगळीकडे वापर होत आहे. एआय म्हणजे परवडणारे तंत्रज्ञान असाही त्याचा अर्थ घ्यायला हवा. शाश्वत विकासाच्या दिशेने पावले टाकत असताना पर्यावरणपूरक इंधन पर्यायांकडे वळायला हवे. त्यातून आम्ही सीएनजीवर चालणारी जगातील पहिली दुचाकी सादर केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या इंधन खर्चात बचत झाली. आमची सीएनजीवरील दुचाकी भविष्यात सीबीजीवर धावू शकेल.
बजाजने सादर केलेली सीएनजी दुचाकी सीबीजीवर चालण्यास योग्य आहे. अमूलने सीबीजीचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करण्याचे पाऊल उचलले आहे. शाश्वत इंधनाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे. व्यापक स्तरावर सीबीजीची निर्मिती झाल्यास पुढील काही वर्षांत आमच्या दुचाकी त्यावर धावू शकतील, असे बजाज यांनी स्पष्ट केले.
यावेळी जयेन मेहता म्हणाले की, अमूलकडून सहकाराच्या मदतीने शेतीला समृद्ध करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. याचबरोबर शाश्वत विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यातूनच आम्ही सीबीजी प्रकल्प उभारले आहेत. शेतकऱ्यांना यातून उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होणार आहे. याचबरोबर हायड्रोजन निर्मितीवर समूहाकडून काम सुरू आहे.
हायड्रोजन दुचाकीवरही काम सुरू
शाश्वत विकासासाठी हरित इंधन पर्यायांवर बजाज समूह काम करीत आहे. यासाठी बजाज ऑटो टेक्नॉलॉजी लिमिटेड ही उपकंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून हायड्रोजन इंधनावर काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात दुचाकी हायड्रोनवर धावतील. या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही बजाज यांनी नमूद केले.
© The Indian Express (P) Ltd