पुणे : घरपोच मागविलेल्या चाॅकलेट शेकमध्ये उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चाॅकलेट शेक देणाऱ्या कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मैत्रिणीने १४ फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडी भागातील एका कॅफेतून चाॅकलेट शेक मागविला होता. तिने घरपोच खाद्यपदार्थ देणाऱ्या एका ॲपवर नोंदणी करून चाॅकलेट शेक मागविला होता. तरुणी लोहगाव भागात राहायला आहे. चाॅकलेट शेक घेऊन रात्री एक कामगार तरुणीच्या घरी आला. तरुणीने चाॅकलेट शेक घेतला. तिने चाॅकलेट शेक पिण्यापूर्वी ग्लास पाहिला. तेव्हा शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर आढळून आला. या घटनेनंतर तरुणीने तिच्या मित्राला याबाबतची माहिती दिली.

त्यानंतर तरुणाने संबंधित कॅफे मालकाशी संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा कॅफे मालकाने तरुणाला धमकावले. चाॅकलेट शेक तयार करताना मिक्सरमध्ये उंदिराचे पिलू पडले. खाद्यपदार्थ तयार करताना पुरेशी काळजी न घेता ग्राहकांच्या जिविताला धोका होईल, असे कृत्य कॅफे मालकाने केल्याचे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय चंदनशिव यांनी कॅफेला भेट दिली. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार ए. एस. आदलिंग तपास करत आहेत.

Story img Loader