पुणे : आदिवासी विकास विभागातील ‘गट क’मधील विविध ६०२ रिक्त पदे भरण्यासाठीची २३ नोव्हेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या भरती प्रक्रियेत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुन:श्च प्रसिद्ध करावी लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाने दिली.
हेही वाचा : पावसाने सरासरी गाठली; पेरण्या ५२ टक्क्यांवर
राज्य शासनाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग संवर्गाचा पदभरतीच्या जाहिरातीत समावेश करून, बिंदूनामावली अद्ययावत करुन गट क संवर्गासाठी पुन्हा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडून बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पदभरतीसंदर्भातील सविस्तर सूचना दिल्या जातील. या पार्श्वभूमीवर पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी या बदलांबाबतची नोंद घेण्याबाबत नाशिकच्या आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.