पुण्यातील मतदार संघांच्या रचनेमध्ये वेळोवेळी बदल झालेले दिसतात. भवानी पेठ विधानसभा मतदार संघ हा पुण्याच्या मध्यवर्ती भागाचा समावेश असलेल्या परिसराचा मिळून तयार झालेला मतदार संघ होता. १९६७ पासून २००४ पर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये सुरुवातीच्या काळात काँग्रेसला या मतदार संघात यश मिळालेले दिसते. काँग्रेसचे टिकमदास मेमजादे हे सलग दोनवेळा निवडून आले होेते. १९७८ च्या निवडणुकीत मात्र जनता पक्षाचे भाई वैद्या हे विजयी झाले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचे अमिनुद्दीन पेनवाले हे एकदा निवडून आले. या मतदार संघावर प्रकाश ढेरे यांचे प्राबल्य होते. ते एकदा अपक्ष आणि दुसऱ्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर या मतदार संघातून विजयी झाले होते. १९९० नंतर काँग्रेसची या मतदार संघावरील पकड ढिली होत गेली आणि १९९५ आणि १९९९ अशा सलग दोनवेळा तत्कलीन शिवसेनेकडून दीपक पायगुडे यांनी विजय साकारला. २००४ च्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमल ढोले पाटील या विजयी झाल्या. त्यानंतर हा मतदार संघ अस्तित्त्वात राहिला नाही. या मतदार संघातील काही भाग कसबा पेठ, पुणे कॅन्टोमेेंट विधानसभा मतदार संघात जोडला गेला आणि हा मतदार संघ इतिहासजमा झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा