पुणे : ससून रुग्णालयातील कैदी पलायनप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीने अखेर आपला अहवाल शुक्रवारी सादर केला. समितीने वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे हा अहवाल दिला आहे. त्यांच्याकडून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठविला जाणार आहे. दरम्यान, हे सचिव परदेश दौऱ्यावर असल्याने ३ नोव्हेंबरला हा अहवाल त्यांच्यासमोर सादर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती ११ ऑक्टोबरला नियुक्त केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, तर सदस्यपदी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार हे होते. ही समिती १५ दिवसांत चौकशी करून सरकारला अहवाल सादर करणार होती.

हेही वाचा : ज्येष्ठाला मोहजालात अडकवून ३० लाखांची खंडणी उकळणारी महिला अटकेत

समितीने १५ दिवस संपताच तातडीने आपला अहवाल शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण आयुक्त निवतकर यांना सादर केला. हा अहवाल निवतकर यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठवला जाणार आहे. सध्या सचिव परदेश दौऱ्यावर आहेत. ते परतल्यानंतर ३ नोव्हेंबरला हा अहवाल त्यांच्यासमोर ठेवला जाईल. त्यानंतर राज्य सरकार या अहवालावर कार्यवाही करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : माळेगाव कारखान्याच्या बाहेर मराठा आंदोलक आक्रमक, अजित पवारांनी गळीत हंगामाच्या शुभारंभाला जाणं टाळल्याची माहिती

ससूनच्या चौकशीचा फेरा

  • रुग्णालय अधिष्ठात्यांपासून शिपायापर्यंत ८० जणांची चौकशी
  • अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, उपअधीक्षकांकडून लेखी जबाब
  • रुग्णालयात २०२० पासून दाखल कैदी रुग्णांच्या अहवालांची तपासणी
  • कैदी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे संशयाची सुई
  • ललित पाटीलवर अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडून उपचार

“ससूनप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. हा अहवाल गोपनीय असल्याने त्यातील तपशील जाहीर करता येणार नाही. राज्य सरकारकडून या अहवालावर कार्यवाही केली जाईल”, असे ससून चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune report submitted by sassoon hospital investigation committee pune print news stj 05 css