पुणे : एके काळी घटना घडताच आरोपीला बेड्या घालणारे पोलीस म्हणून ख्याती असलेल्या पुणे पोलिसांचे खबऱ्यांचे जाळे आणि गणेश मंडळांशी असलेल्या मैत्रिपूर्ण संपर्कात दरी पडल्याने पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याचे निदर्शनास आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पुणेकर यांची तुटलेली नाळ आणि ‘फील्ड वर्क’पेक्षा कार्यालयात बसून आरोपींचा शोध घेण्याची कार्यपद्धतीही गुन्हेगारी वाढीला कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले आहे.

गेल्या काही काळात शहरात विविध प्रकारचे गुन्हे घडत असून, अत्याधुनिक संपर्क साधने हाताशी असूनही अनेकदा आरोपी लवकर सापडत नाही. अशा हरवलेल्या तपासांची संख्या वाढण्याचे कारण खबऱ्यांचे क्षीण झालेले जाळे असल्याचे माजी पोलीस अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. पुणे पालीस दलात यापूर्वी अनेक अधिकारी पोलीस तपासात अग्रेसर असायचे.

काही अधिकाऱ्यांची खबऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा असायची. त्यामुळे गुन्हा घडताच पोलिसांना सुगावा लागत असे. काही वेळा गुन्हा घडण्यापूर्वीही अधिकाऱ्यांना खबर मिळायची. त्यामुळे गुन्हा रोखणे पोलिसांना शक्य होत होते. गणेश मंडळे ही पोलीस अधिकाऱ्यांचे माहितीचे प्रमुख स्राोत असायची. मात्र, आता पोलीस आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांच्या संपर्कात दरी पडल्यासारखी स्थिती झाली असल्याचेही निवृत्त अधिकारी अधोरेखित करतात.

मूळचे पुण्याचे आणि गुन्हे शाखेत अनेक वर्षे काम केलेले निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी म्हणाले,‘सध्या पोलीस अधिकाऱ्यांचा बराचसा काळ प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन बैठकांना हजेरी लावण्यात जातो. मात्र, या बैठकांबरोबरच अधिकाऱ्यांचा नागरिकांशी सातत्याने संपर्क असणे आवश्यक असते. त्यामध्ये सद्या:स्थितीत कमतरता जाणवते. गणेश मंडळे आणि त्यांचे कार्यकर्ते हे माहितीचे हक्काचे स्राोत आहेत. मात्र, सध्या गणेश मंडळे आणि पोलीस यांच्यातील संपर्क कमी होत आहे. कोणतीही घटना घडल्यानंतर त्याबाबतची अधिक माहिती गणेश मंडळांशी संपर्क असल्यास ताबडतोब मिळू शकते. एखाद्या घटनेने समाजात दुही निर्माण होणार असल्यास सामाजिक सलोखा राखण्यात गणेश मंडळांची साथ मोलाची ठरते. विशेषत: वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गणेश मंडळांशी संपर्क वाढविला पाहिजे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होऊ शकेल.’

‘पोलीस अधिकाऱ्यांची स्वत:ची खबऱ्यांची किंवा संर्पकाची यंत्रणा असली पाहिजे. त्यामध्ये सध्या कमतरता आढळून येत आहे. डिटेक्शन ब्रँचने (डीबी) फक्त गुन्ह्याचा तपास कमी करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याबरोबरच गुन्हा घडणार नाही, याची खबरदारी घेतल्यास गुन्हे रोखणे शक्य आहे,’ असे जोशी यांनी स्पष्ट केले.

‘पुणेकर कायम मदतीच्या भूमिकेत असतात. त्यांचे सहकार्य घेतले पाहिजे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी वैयक्तिक संपर्क साधल्यास संघटित गुन्हेगारी आणि गुन्हे थोपविणे शक्य आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा चढता आलेख

पुण्यात १९५० नंतर गुन्हेगारीने उग्र रूप धारण केले. विशेष म्हणजे, १९५५ ते ५७ या कालावधीत नऊ पैलवानांचे हाणामारीत खून झाल्याची नोंद पुणे पोलिसांच्या दप्तरी आढळून येते.

● पुण्यातील गुन्हेगारीला १९६५ ते १९७५ या कालावधीत संघटित स्वरूप येऊ लागले. या काळात संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या वाढल्या.

● कसबा पेठेत गोविंद तारू, लष्कर आणि भवानी पेठ परिसरामध्ये नन्हेखान रामपुरी आणि अकबरखान रामपुरी यांचा त्या काळात दबदबा असल्याचे जुने अधिकारी सांगतात.

● टोळीयुद्धाला १९७५ मध्ये सुरुवात झाली.

● टोळीयुद्धाचा पहिला भडका १९८२ मध्ये उडाला. त्यास प्रेमप्रकरण कारणीभूत ठरले होते. पिंपरी-चिंचवडमधील एका सराईत गुन्हेगाराच्या मुलीचे आंदेकर टोळीतील मुलाशी प्रेमसंबंध होते. त्याला मारण्याची सुपारी कुख्यात गुंड प्रमोद माळवदकर याला देण्यात अली हाती. त्यावरून माळवदकर आणि आंदेकर टोळीमध्ये चकमकी झाल्या.

● शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात ७ जुलै १९८४ रोजी बाळू आंदेकर याचा माळवदकर आणि त्याच्या साथीदारांनी खून केल्यानंतर टोळीयुद्ध भडकले आणि खुनांचे सत्रच सुरू झाले.

● माळवदकर १९९७ मध्ये पोलीस चकमकीत मारला गेला.

● कालांतराने आंदेकर टोळीने राजकारणात प्रवेश केल्याने टोळीयुद्ध थंडावले.

● स्थानिक टोळ्या थंडावल्यानंतर मुंबईतील टोळ्या पुण्यात सक्रिय झाल्या. आंदेकर टोळी ही छोटा राजन टोळीसाठी, तर माळवदकर टोळी अरुण गवळी टोळीसाठी काम करू लागल्याचे सांगितले जाते.

● मुंबईतल्या टोळ्यांसाठी पुण्यात काम करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. सध्या पोलिसांच्या दप्तरी शंभरहून अधिक टोळ्यांची नोंद झाली आहे.

Story img Loader