पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित रिंगरोडच्या पश्चिम मार्गाच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनाने पूर्व मार्गावरील तालुक्यांमधील गावांचे भूसंपादन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातील सहा गावांतील ७३.३१ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनासाठीचा मोबदला मंगळवारी निश्चित करण्यात आला.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएसआरडीसीकडून रिंगरोड हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पश्चिम मार्गावरील भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी (१६ जानेवारी) पूर्वेकडील मावळ आणि हवेली गावांमधील भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. पूर्व मार्गावर मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधील ४६ गावांचा समावेश आहे. त्यानुसार मावळ तालुक्यामधून वडगाव, कातवी, वराळे, आंबी, आकुर्डी, माणोलीतर्फ चाकण ही सहा गावे बाधीत होणार आहे. त्यासाठी ७३.६१ हेक्टर जमिनीचे संपादन निश्चित करण्यात आले आहे.

हेही वाचा : राज्यात चार दिवस थंडीचे

मात्र, यातील वडगाव, कातवी आणि वराळे या गावातून राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्तावित पुणे ते छ. संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉर जाणार असल्याने ही गावे प्रभाव क्षेत्रात आली आहे. त्यामुळे मोबदल्यात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून दर निश्चित केले आहेत, तर आंबी, आकुर्डी माणोली ही ग्रामीण भागात असल्याने नगर विकास विभागाने मूल्यांकन केल्यानुसार जुने व्यवहार पडताळणी करून भूसंपादनाचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

हेही वाचा : कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द होणार? साखर आयुक्तांकडून लवकरच राज्य सरकारला अहवाल

मोबदला निश्चित झाल्याने संबंधित गावांतील नागरिकांना भूसंपादन नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मुदतीत संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के अधिकचा मोबदला देण्यात येणार आहे. पूर्वेचे भूसंपादन वेगाने करण्यासाठी मावळ तालुक्यातील गावांच्या भूसंपादनाबाबत आढावा घेण्यात आला. त्यामध्ये ८८३ कोटी ५५ लाख रुपयांचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. भूसंपादनासाठीचा निधी संपत आला असून राज्य शासनाकडे एक हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.