पुणे : मुळशी येथील जाहीर सभेत आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये यंदा “धनशक्ती”चा वापर होत असल्याचा आरोप केला होता. आता बारामती सहकारी बॅंकेतून ५०० रूपयांचा नोटा गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मतदानाची तारीख जवळ येत असताना आता हा नवा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार बारामती सहकारी बॅंकेतून ५०० रूपयांच्या नोटा गायब झाल्याची माहिती आहे. त्या नोटा खातेदारांना मिळत नाहीत. आता या नोटा कुठे गेल्या. याचे रहस्य काही उलगडत नाही. हा निव्वळ योगायोग आहे की पाच दिवसांवर निवडणूक आल्याने धनशक्तीचा सहयोगाने होणाऱ्या हाऊसफुल्ल शोचा परिणाम आहे, हे बारामतीकरच ठरवतील असे म्हणत पुणे जिल्हा बॅंकेबाबतही असेच बघावे लागेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
हेही वाचा : वायनाडमधील पराभवाच्या भीतीने राहुल गांधींचा रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय – विनोद तावडे
दरम्यान, याआधी देखील रोहित पवारांनी एक व्हिडीओ एक्सवर टाकत अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांच्या सभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पैसे दिल्याचा आरोप केला होता. तसेच व्हिडीओ असलेल्या महिलांनी देखील दिलेले पैसे बाहेर काढून दाखवले होते.