पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “केंद्र सरकारमधील नेते त्यांच्या पूर्ण ताकदीचा आम्हाला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतील. संघर्ष यात्रा, पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जाण्याचा विचार करत असतो. लोकांना महत्व देण्याचा विचार करत असतो. लोकांमध्ये जाणं त्यांना योग्य वाटत नसेल तर तो त्यांचा विषय आहे. शेवटी आम्ही लोकांच्या हिंमतीवर, लोकांच्या ताकदीवर लढणार आहोत. जे सत्तेत आहेत ते पैशांच्या आणि अहंकाराच्या ताकदीवर आहेत. निवडून आलो तर लोकांमुळे, निवडून नाही आलो तरी लोकांमुळेच, पण आम्ही आमचा विचार सोडणार नाही, लढत राहणार”, असे रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा : शिरूर लोकसभा : अजित पवारांच्या शिरूर लोकसभेच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर विलास लांडे अॅक्टिव्ह!
“शरद पवार यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा केला. लोकांशी संपर्क ठेवला. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी जे केले त्याला बंड म्हणता येणार नाही. त्यावेळी अनेक लोकांनी एकत्र येऊन तो निर्णय घेतला होता. आता सत्तेत असणारे नेते अनेक वर्ष शरद पवारांमुळे सत्तेत होते. आपल्या कारवाई होईल म्हणून काही लोक सत्तेत गेले आहेत. भाजपबरोबर तुम्ही गेलात तर तुम्हाला भाजपची स्क्रिप्ट ही वाचावीच लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत तेच झालं. आता अजितदादांना बरोबरही तेच होतंय. भाजपला कुठेही पवार हे परवडणारे नाहीत. टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न मागील काही महिन्यात झाला आहे. आता पवार विरुद्ध पवार करण्याची भाजपची इच्छा आहे”, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.