पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके हे चार उमेदवार आहेत. तर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४.९ टक्के इतके मतदान झाले आहे. तसेच शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला आहे. मात्र अद्यापही काही मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. ही मतदान प्रक्रिया पुढील काही वेळेत पूर्ण होऊन अंतिम आकडेवारी समोर येईल. मात्र या मतदानावेळी देखील राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहे. भाजप कार्यकर्त्यांमार्फत पैशांचे वाटप सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केल्याचे पाहण्यास मिळाले. त्या आरोपाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेत रवींद्र धंगेकर यांना सुनावल्याचे पाहण्यास मिळाले.
त्या आरोपावर रुपाली चाकणकर म्हणाल्या की, राज्यभरात महायुतीने जनाधार असलेले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यापासून विरोधक आमच्या उमेदवारावर आरोप करीत आलेले आहेत. आमचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून तर येतीलच, त्या विजयी उमेदवारांमध्ये पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील असणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी करोना काळात शहरातील प्रत्येक नागरिकांसाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी नागरिक उभे राहतील आणि मुरलीधर मोहोळ हे एक लाख मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : पुण्यात मतदानाचा टक्का वाढला; शिरूर, मावळमध्ये झाली घट
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार (रवींद्र धंगेकर) हे कालपासून आरोप करीत आहेत की, पैशांचे मोठ्या प्रमाणावर वाटप केले जात आहे. तर आज अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्या असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. हे सर्व आरोप रवींद्र धंगेकर यांचे पाहिल्यावर एकचं वाटतं ते म्हणजे पराभवाच्या भीतीने आणि नैराश्यातून आरोप सुरू असल्याचे सांगत रवींद्र धंगेकर यांच्यावर त्यांनी टीका केली.