पुणे : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. फर्ग्युसन रस्ता परिसरातील एका बंगल्यात शिरलेल्या बंगला मालकाला दगड भिरकावून मारण्याची धमकी देऊन चंदनाचे झाड कापून नेले. दोन महिन्यांपूर्वी प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवून चंदन चोरी केली होती. चंदन चोरट्यांनी आता थेट नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केल्याने सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत आर्यन शिरोळे (वय २३) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन महाविद्यालयासमोर असलेल्या शिरोळे रस्त्यावर शिरोळे यांचा शिवराई बंगला आहे. २ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना बंगल्यातील चंदनाचे झाड कापण्याचा आवाज आला. त्यानंतर ते बंगल्याच्या आवरात आले. तेव्हा तीन ते चार चाेरटे चंदनाचे झाड करवतीने कापत होते. त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांना दगड भिरकावून मारण्याची धमकी देऊन आरडाओरडा करू नका, असे सांगितले. आरडाओरडा केल्यास दगड मारेल, असे सांगितले. त्यानंतर चंदनाचे झाड कापून चोरटे अंधारात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.
हेही वाचा : अभ्यासिकांचे फायर ऑडिट करा, अन्यथा… युवा सेनेचा महापालिकेला इशारा
चंदन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश
आठवड्यापूर्वी विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली होती. शहरातील सोसायटी, शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्थांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुकुंदनगर, मार्केट यार्ड, प्रभात रस्त्यावरील सोसायटीत शिरुन चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली होती. चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवून चंदनाचे झाड कापून नेले. खडकीतील दारुगोळा कारखान्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेण्यात आले. चंदन चोरीच्या घटना वाढत असून, चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.