पुणे : पुण्यातून बेपत्ता झाल्यानंतर माओवादी चळवळीत ओढला गेलेला संतोष वसंत शेलार उर्फ पेंटर शरण आला. शेलार गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. तो पुण्यात आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेत शेलार पेंटर नावाने ओळखला जातो. भवानी पेठेतील कासेवाडी भागात राहणारा संतोष वसंत शेलार (वय ३३) ७ नोव्हेंबर २०१० पासून बेपत्ता झाला होता. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी खडक पोलीस ठाण्यात दिली होती.
बंदी घातलेल्या माओवादी संघटनांनी पुणे, मुंबई, ठाणे परिसरात काम सुरू करून शहरी भागातील तरुणांना माओवादी चळवळीत ओढण्याचे काम सुरू केले होते. पुण्यात अंजला सोनटक्केने माओवादी विचारधारेचा प्रसार करून तरुणांना जाळ्यात ओढले होते. त्यानंतर पुण्यातील ताडीवाला रस्ता भागातील एक तरुण आणि शेलार बेपत्ता झाले होते.
हेही वाचा : अंतर्वस्त्रात सोने लपवून तस्करी; प्रवाशाकडून ७३ लाखांचे सोने जप्त
गडचिरोलीच्या दुर्गम भागात शेलार माओवादी संघटनेसाठी काम करत होता. तो माओवादी संघटनेतील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होता. गडचिरोली, भामरागड परिसरात पोलिसांच्या पथकावर हल्ले झाले होते. गडचिराेली, भामरागडसारख्या दुर्गम भागात शेलार गेल्या काही वर्षांपासून वास्तव्य करत होता. शेलार बेपत्ता झाल्यानंतर एटीएसने शोध त्याचा शोध घेतला होता. तो माओवादी चळवळीत ओढला गेल्याचे तपासात उघडकीस आले होते. शेलार गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. तो पुण्यातील कासेवाडी भागात आल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस तसेच राज्य दहशतवादी विरोधी पथकाला दिली. शेलारवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.