पुणे : सर्व शिक्षा अभियानांतर्गत २००३ पासून जिल्हा, तालुका आणि महापालिका स्तरावर सहायक कार्यक्रम अधिकारी, विषय साधन व्यक्ती, कनिष्ठ अभियंता, डाटा एण्ट्री ऑपरेटर, दस्तऐवज व संशोधन सहायक आणि वरिष्ठ लेखा सहायक अशा विविध पदावर कंत्राटी पद्धतीवर अनेक कर्मचारी काम करत आहेत. शालेय शिक्षणविषयक प्रशिक्षण देणे, शाळाभेट करून आदर्श पाठ घेणे, विद्यार्थी मार्गदर्शनासह शासनाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणविषयक योजना राबवणे, जिल्हा परिषद व मनपा क्षेत्रातील माहितीचे संकलन व संश्लेषण करणे इत्यादी कामे हे कर्मचारी करतात. आता या कर्मचाऱ्यांनी सरकारला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सर्व शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार व अर्हतेनुसार रिक्त पदांवर किंवा आहे त्याच पदांवर कायम करण्याच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा समग्र शिक्षा संघर्ष समितीने दिला आहे. मागण्या मान्य होणार नसतील, तर कंत्राटी सेवापूर्तीनंतर शासनाने इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वेळोवेळी आंदोलन, उपोषण करूनही न्याय मिळत नसल्याची खंतही कर्मचाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

‘तुटपुंज्या वेतनावर सर्व शिक्षा अभियान राबवण्याचे काम कंत्राटी कर्मचारी करतात. शासनाच्या निवड प्रक्रियेतूनच त्यांची निवड करण्यात येते. मात्र, त्यांना कोणताही शासकीय लाभ देण्यात येत नाहीत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करून घेण्यात यावे,’ असे समितीच्या अध्यक्षा योगिता बलाक्षे यांनी सांगितले.

Story img Loader