पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयु्कत रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते मध्यस्थ म्हणून काम करत असून, त्याने रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप धंगेकर यांनी नुकताच केला होता. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. शेवतेला गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.
हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी आज मोठ्या हालचाली, छत्रपती संभाजीराजे दिल्लीत दाखल
ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ललितने रुग्णालयातून मेफेड्रोन विक्रीचे व्यवहार केले होते. त्यासाठी ललितने शेवतला पैसे दिले होते. शेवते मध्यस्थ म्हणून काम करत होता. त्याने ससूनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पैसे दिल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. शेवतेला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. न्यायालयाने ललितसह साथीदारांना येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.