पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्यापासून कक्ष क्रमांक १६ चर्चेत आला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) असलेल्या या कक्षाचे कैदी कक्षात रूपांतर करण्यात आले होते. या कक्षात अनेक महिने बडे कैदी उपचाराच्या नावाखाली पाहुणचार घेत असल्याचेही उघड झाले. त्यामुळे आता व्हीआयपी कैदी कक्ष बंद करण्याच्या हालचाली ससून प्रशासनाकडून सुरू आहेत.
ससून रुग्णालयात कक्ष क्रमांक १६ हा सध्या कैदी रुग्ण कक्ष आहे. पूर्वी हा कक्ष अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवरील उपचारासाठी (व्हीआयपी) होता. ससूनमध्ये ऐतिहासिक वारसा असलेल्या जुन्या इमारतीत आधी कैदी रुग्ण कक्ष होता. या इमारतीचे नूतनीकरण सुरू झाल्यानंतर दुसऱ्या इमारतीतील कक्ष क्रमांक १६ चा वापर कैदी रुग्ण कक्ष म्हणून सुरू झाला. या कक्षामध्ये स्वतंत्र खोल्या आहेत. महिनोन् महिने अनेक बडे कैदी या कक्षात मुक्काम ठोकतात.
हेही वाचा : पुणे : इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीला आग, काही मिनिटांत गाडी जळून खाक!
कक्षात उपचार करणारे डॉक्टर, कर्मचारी आणि पोलिसांशिवाय इतर कोणाला प्रवेश नसल्यामुळे आतमध्ये काय सुरू आहे, याची कोणालाही माहिती नसते. विशेष म्हणजे, ललित पाटीलने पलायन केले, त्या वेळी या कक्षात बडे कैदी अनेक महिने मुक्काम ठोकून असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण अंगाशी येताच रुग्णालयात केवळ चार कैदी ठेवून १२ कैद्यांना कारागृहात पाठविण्यात आले. त्यामुळे खरेच हे कैदी आजारी होते का, असाही प्रश्न उपस्थित झाला.
हेही वाचा : पुणे : ‘कोजागरी’निमित्त उद्याने मध्यरात्रीपर्यंत खुली
आता कैद्यांसाठीचा हा व्हीआयपी कक्ष बंद करण्याचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने तयार केला आहे. कारण या कक्षावरून ससून रुग्णालय प्रशासनाची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली आहे. त्यामुळे हा कक्ष बंद करण्याचे पाऊल उचलले जाणार आहे. कैद्यांसाठी कक्ष क्रमांक ३ अथवा १८ करण्याचा विचार सुरू आहे. कैद्यांनी एक्स-रे, सीटी स्कॅनसाठी जवळ पडेल आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नवीन कक्ष निवडला जाणार आहे. याबाबत रुग्णालयातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
असा असेल नवीन कैदी कक्ष
- सर्व तपासणी विभागांच्या नजीक असेल
- सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रचना
- कारागृह नियमानुसार पुरेशा उपाययोजना
- कैद्यांसाठी कक्षात स्वतंत्र खोल्या नसणार
- कैद्यांच्या हालचालींवर नजर ठेवता येणार
हेही वाचा : मराठा आरक्षण: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला धनंजय मुंडेंनी येणे टाळले
दानवे यांच्याकडून ससूनचा आढावा
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी ससून रुग्णालयाचा आढावा घेतला. या वेळी ते म्हणाले, की ससून रुग्णालयात फक्त १,२०० खाटा असून, त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. हाफकिनमार्फत मागील वर्षी एक रुपयाचेही औषध ससूनला मिळाले नाही. या वर्षी मागणी नोंदवूनही ससूनला औषधे मिळाली नाहीत. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ससूनला औषध खरेदीसाठी पैसे मिळालेले नाहीत. येथे रुग्णांना झोपायला खाटा नाहीत. मात्र, व्हीआयपी कैदी अनेक महिने मुक्काम ठोकत आहेत. याप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.