पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने पदमुक्त केले होते. त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करून आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर डॉ. काळे हे अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारून लगेचच रजेवर गेले. आता सुमारे २० दिवसांनी डॉ. काळे यांच्या तात्पुरत्या नियुक्तीचा आदेश राज्य सरकारने काढला आहे.
ससूनच्या अधिष्ठातापदावरून त्यांची बदली करण्याचा आधीचा आदेश उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबरला रद्द केला होता. त्याचदिवशी अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील पलायन प्रकरणात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. ठाकूर दोषी आढळले. राज्य सरकारने डॉ. ठाकूर यांना पदमुक्त केले तर अस्थिव्यंगोपचार विभागातील पथकप्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित केले. त्यामुळे अधिष्ठातापद रिक्त झाल्याने डॉ. काळे यांनी तातडीने ११ नोव्हेंबरला या पदाचा कार्यभार स्वीकारला.
हेही वाचा : पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते, फूटपाथवर वाहने पडून; महापालिका करणार ही कारवाई
डॉ. काळे हे कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच रजेवर गेले. त्यानंतर २० दिवसांनी त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला आहे. सध्या ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. शेखर प्रधान यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे सेवा ज्येष्ठतेनुसार डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपविणे आवश्यक होते. मात्र, ते रजेवर असल्याने डॉ. प्रधान यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे. त्यामुळे अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार कोणीच स्वीकारण्यास तयार नसल्याची चर्चा ससूनमध्ये रंगली होती.
हेही वाचा : शाळकरी मुलीला धमकावून बलात्कार; सख्खे भाऊ अटकेत
तात्पुरत्या नियुक्तीचा गोंधळ
डॉ. विनायक काळे यांची ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांकडून निघणे अपेक्षित होते. याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने पाठविला मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविला होता. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता डॉ.काळे यांच्या तात्पुरत्या नियुक्तीचा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी काढला आहे.